Pregnancy and Bloodpressure

वाहणाऱ्या रक्ताने शुद्ध रक्त वाहिनीवर आतून दिलेला दाब म्हणजे ब्लड प्रेशर. हृदय आकुंचन पावले असताना (सिस्टॉलिक ) ११० ते १३० हा नॉर्मल वरचा आकडा आणि हृदय स्वस्थ स्थितीत असताना (डायस्टॉलिक)७० ते ८० हा नॉर्मल खालचा आकडा अशाप्रकारे ब्लड प्रेशर मोजले जाते.

प्रेग्नेंसी राहण्याआधी ब्लड प्रेशर नॉर्मल असताना व प्रेग्नेंसी राहिल्यानंतर , पाचव्या महिन्यानंतर (गर्भारपणाच्या वीस आठवड्यांनंतर)

 • ब्लड प्रेशर सिस्टॉलिक (वरचा आकडा)१४० किंवा जास्त
 • आणि डायस्टॉलिक (खालचा आकडा)९० किंवा जास्त असे आढळून आल्यास व दोन वेळेला तपासणी करून तशी खात्री झाल्यास, अशा पेशंटला प्रेग्नेंसी इन्ड्युसड् हायपर टेन्शन आहे असे म्हणले जाते.

१६०/११० एम्.एम्.एचजी. किंवा यापेक्षा जास्त ब्लड प्रेशर ची नोंद आल्यास त्याला सीव्हियर-अती तीव्रतेचे ब्लडप्रेशर समजले जाते.

डिलिव्हरी नंतर सहसा हे ब्लड प्रेशर नॉर्मल होते.क्वचित काही पेशंट्सना जास्त काळ वाढलेले ब्लडप्रेशर राहू शकते.

ब्लड प्रेशर नॉर्मल असताना आईकडून वारे मार्फत बाळाकडे योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो आणि बाळाला ऑक्सिजन व पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात.त्यामुळे बाळाची वाढ नीट होते. ब्लडप्रेशर वाढलेले असताना असा रक्तपुरवठा योग्य न झाल्यामुळे बाळाची वाढ खुरटण्याची शक्यता असते. तसेच ही अवस्था पुढे प्री एक्लाम्पशिया या स्थितीमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. योग्य वेळेस तपासणी आणि औषधोपचार करून या धोक्याची तीव्रता आटोक्यात आणता येते.

प्रेग्नेंसी राहण्याआधी नॉर्मल ब्लड प्रेशर असलेल्या पेशंट मध्ये

 • गर्भारपणाच्या पाचव्या महिन्यानंतर ( वीस आठवडे) झाल्यानंतर ब्लड प्रेशर 140/ 90 एवढे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास
 • आणि त्याबरोबर लघवीमध्ये प्रथिने वाहून जाणे
 • सतत आणि दीर्घकाळ डोकेदुखी होणे
 • दिसायला धूसर दिसणे,डबल दिसणे.
 • अचानक जास्त प्रमाणात वजनवाढ
 • अंगावर/हाता-पायांवर सूज येणे.

अशा प्रकारची लक्षणे दिसू लागल्यास त्यास प्रिएकलाम्पशिया असे म्हणले जाते. ही अवस्था गंभीर स्वरुपाची असून त्याचे दुष्परिणाम धोकादायक ठरु शकतात.

आईच्या आरोग्यावर

 • मेंदू, लिव्हर, किडनी अशा महत्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होवून त्यांच्या कामावर परिणाम होणे.
 • रक्त गोठून त्याची गुठळी होण्याचा व त्यामुळे रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका.
 • झटके येणे /आकडी येणे.
 • अतिशय गंभीर स्थिती ज्याला शास्त्रीय भाषेत हेल्प (HELLP)सिंड्रोम म्हणतात. यासाठी इन्टेन्सिव्ह केअर ची गरज लागते आणि ताबडतोब बाळ डिलिव्हरी करून घ्यावे लागते.

बाळाच्या आरोग्यावर

 • बाळाची वाढ खुरटणे.वाढी वरती अति तीव्र परिणाम झाल्यास बाळाच्या मेंदूच्या वाढीवरही परिणाम होतो.
 • बाळ पोटामध्ये दगावणे.
  1. अशा पेशंटमध्ये अचानक रक्तस्त्राव होण्याची ( प्लासेन्टल ऍब्र्प्शन) ची शक्यता असते.
  2. तसेच अशा पेशंटमध्ये आईच्या आरोग्यास धोका वाढल्यास तिचा जीव वाचवण्यासाठी व धोका कमी करण्यासाठी लवकर डिलिव्हरी करून घेणे आवश्यक होते व त्यामुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका जास्त असतो.
  3. डिलिव्हरी नंतरही काही रुग्णांमध्ये कायमस्वरूपी बीपी वाढलेले राहण्याची आणि त्याची गुंतागुंत होण्याची शक्यता,अशा रुग्णांमध्ये वाढते.
  4. ज्यांना पी इ चा त्रास झाला आहे अशा पेशंटच्या बाबतीत रक्ताची गुठळी होणे, किडनीचा आजार ,हार्ट ऍटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

कोणा बाबत पी आय एच किंवा पी इ चा धोका जास्त असतो?

 • पहिलटकरीण किंवा दोन प्रेग्नेंसी मध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त अंतर
 • पूर्वीच्या प्रेग्नेंसी मध्ये अशा प्रकारची गुंतागुंत असल्यास
 • जुळे किंवा तिळे अशी गर्भधारणा असल्यास
 • प्रेग्नेंसी राहण्याचे आधीपासूनच ब्लडप्रेशर जास्त असण्याचा आजार असणाऱ्या महिला
 • 35 पेक्षा वय जास्त असणाऱ्या महिला.
 • डायबेटिस असलेल्या रूग्ण.
 • ज्यांना मूत्रपिंडाचा आजार आहे अशा रुग्ण.
 • ऑटो इम्युन डिसऑर्डर असलेल्या रुग्ण.
 • स्थूलपणा, BMI 30 पेक्षा जास्ती

पीई च्या रुग्णांना जेव्हा झटका किंवा आकडी येते तेव्हा त्याला एक्लाम्पशिया म्हणले जाते. ही अवस्था अति जोखमीची आणि गंभीर असते आई आणि बाळाचे जीवन त्यामुळे धोक्यात येते अशा वेळेला आईचा जीव वाचवण्यासाठी ताबडतोब बाळ डिलिव्हरी करून काढले जाते नियमित तपासणी आणि उपाय घेणाऱ्या मातांना अशा धोक्याचे प्रमाण कमी असते.

पी आय एच आणि पीई नक्की का होते याचे एकच खात्रीशीर कारण माहीत नसल्याने पहिल्या प्रेग्नेंसी मध्ये ते टाळण्याचे नेमके उपाय सांगता येत नाहीत. पण तसे झाल्यास त्याची धोक्याची पातळी कमी राहावी यासाठी

 • प्रेग्नेंसी राहण्याआधीच योग्य आहार व व्यायाम करून वजन आटोक्‍यात ठेवणे आणि आपली जीवनशैली आरोग्यपूर्ण राखणे.
 • प्रेग्नेंसी राहिल्यानंतर नियमितपणे अँटी नेटल चेकअप करणे व या चेकअप मध्ये बीपी वाढलेले आढळल्यास त्याची खात्री करून त्यानुसार उपाययोजना करणे.
 • गर्भधारणेच्या साधारण 12 ते 13 आठवड्या दरम्यान पी इ मार्कर्स (PIGF)ही टेस्ट आपल्याला भविष्यात पी इ होण्याचा धोका कितपत आहे याची सूचना देते.ही टेस्ट डबल मार्करस् या टेस्ट सोबतच केली जाते.
 • 12 ते 13 आठवड्या दरम्यान करावयाच्या सोनोग्राफीच्या तपासणीमध्ये युटेराइन आर्टरीचा पी.आय.मोजून त्याद्वारे पी इ होण्याची शक्यता वर्तवली जाते.
 • ऍस्पिरिन व इतर काही औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना.
 • प्रेग्नेंसी ठेवण्या आधीच स्त्रीरोग तज्ञांशी बोलून सल्ला घ्यावा
 • ब्लड प्रेशर किती प्रमाणात आहे तसेच त्याचा तुमच्या किडनी आणि ह्रुदया वरती काय परिणाम झाला आहे याबाबत उपाय उपचार करणाऱ्या फिजिशियन डॉक्टरांकडून माहिती करून घ्या.
 • तसेच त्यांना प्रेग्नेंसी ठेवण्याचा विचार आहे याबाबतही माहिती देऊन सल्ला विचारा.
 • प्रेग्नेंसी राहिल्यानंतर चालू असलेले औषधोपचार एखादवेळेस बदलण्याची गरज लागू शकते याची तयारी ठेवा .योग्य आहार, व्यायाम आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली यामुळे आजाराचे धोके आणि गुंतागुंत आटोक्यात ठेवता येते.

तरीही अशा पेशंटला पी आय एच आणि पी इ चा धोका इतर पेशंट पेक्षा जास्त असतो ही बाब लक्षात ठेवावी.

 • मातेने कमी प्रमाणात हालचाली करणे
 • ब्लड प्रेशर नॉर्मल च्या जवळ/ कमी राहण्यासाठी बाळाला सुरक्षित अशा औषधांची उपाययोजना
 • औषधांनी बीपी कमी न झाल्यास किंवा खूप जास्त प्रमाणात वाढल्यास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपाय केले जातात. शक्यतो आईला धोका न पोहोचवता बाळ परिपक्व होण्याची साधारण ३६ते ३७ आठवडे एवढे होण्याची वाट पाहिली जाते.
 • तरीही खूप जास्त प्रमाणात बीपी वाढल्यास ,पीई ची लक्षणे तीव्र स्वरूपात दिसू लागल्यास व त्यामुळे मातेच्या जीवितास धोका होण्याची शक्यता वाटल्यास बाळ डिलिव्हरी करून बाहेर काढले जाते.