वेदनारहित प्रसूती :समज /गैरसमज

डिलिव्हरीच्या कळा सुरु होतात म्हणजेच गर्भाशयाचे स्नायू आकुंचन(contraction) पावायला लागतात. स्त्रिला कळ जाणवते ती या आकुंचनामुळे.या आकुंचनपावण्यामुळे बाळही खाली प्रसव मार्गामध्ये ढकलले जाते,त्या दाबामुळे गर्भपिशवीचे तोंड उघडू लागते. या बदलामुळे आकुंचानाचा जोर वाढवण्याचा संदेश मेंदूला मिळतो आणि त्यामुळे कळांची वारंवारिता(frequency),काळ (duration), तीव्रता (intensity)वाढते. स्त्रिला जाणवणाऱ्या कळांच प्रमाण आणि वेदनाही याबरोबर वाढतात.

प्रत्येक स्त्रीचं बाळंतपण आणि तिचा वेदनेचा अनुभव हा हे आगळां-वेगळांच (unique) असतो.तिला जाणवणाऱ्या वेदनेचं प्रमाण हे वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून असतं, जसं बाळाचं वजन,त्याची पोझिशन,स्त्रीच्या माकडहाडाचे(Shape and size of pelvis) आकारमान,कळांची तीव्रता आणि तिची स्वतःची मानसिकता,सहनशीलता.काही स्त्रियांच्या मनात दुखण्याविषयी भीतीच खूप असते. प्रत्येकीचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळेच एखादीला कळा किती सहन होतील किंवा नाही याचा अचूक अंदाज वर्तवणे शक्य होत नाही.

गर्भधारणा झाल्यापासून (त्या आधीही) स्वतःची ताकद (stamina)वाढवावी,व्यायाम करून स्नायूंना बळकटी आणावी,श्वसनाचे व्यायाम करावेत,तसेच काही तणावमुक्तीचे तंत्र (relaxation techniques) शिकून सराव करावा जेणेकरून आपली क्षमता वाढेल व सहन करण्याचं बळ मिळेल.

आधी सांगितल्या प्रमाणे बाळंतपणाच्या कळा या गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन होते त्यामुळे असतात. हे आकुंचन झाल्यानंतर काही काळासाठी हे स्नायू शिथिलही होतात आणि त्यामुळे गर्भाशयाचा आणि बाळाकडे होणारा रक्तपुरवठा सुरळीत चालू राहतो.तेव्हा प्रसुतीच्या कळा नैसर्गिक ,प्रमाणबद्ध आणि प्रसुतीच्या नेमक्या काळापर्यंत असतील तर त्याचा बाळावर काही परिणाम होत नाही. याच कळा मात्र स्त्रीच्या सहन करण्याच्या कुवतीबाहेर असतील तर ती थकून जाते,नाडीचे ठोके जलद पडू लागतात,काही जणींच्या बाबतीत ब्लड प्रेशर वाढते,हृदयरोगाच्या पेशंटच्या बाबतीत हृदयावर ताण येतो. गरम पाण्याने शेकणं,मालिश करणं, शरीराचे स्नायू प्रयत्नपूर्वक शिथिल करणं,याखेरीज श्वसनाचे व्यायाम (Lamaze Technique),संमोहन (Hypnotism),अँरोमा थेरपी ,पाण्यात बसणं(Hydrotherapy) यासारख्या अनेक पद्धती वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जातात.

बाळंतपणाच्या कळा म्हणजेच गर्भाशयाचं आकुंचन पावणं(contractions) बंद न करता त्यामुळे होणाऱ्या वेदना (pain) औषधांचा वापर करून बंद /कमी करणं म्हणजे वेदनारहित प्रसूती.

वेदनारहित प्रसूतीसाठी जास्त प्रचलित आणि मान्यता असलेली पद्धत म्हणजे एपीड्युरल एनाल्जेसिया.

आताएपीड्युरल हा शब्द समजावून घेवू.

APDular

आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्या शरीराच्या पाठीमध्ये मणक्यांचा कणा असतो.(vertebral column)

मेंदूपासून निघणाऱ्या मज्जारज्जुचे तो रक्षण करतो.(spinal cord) मज्जारज्जुपासून अनेक मज्जातंतू(nerves) निघतात जे शरीराच्या अनेक भागापर्यंत जातात व तेथून मेंदूपर्यंत संवेदना पोहोचवतात. मज्जारज्जुच्यावर असलेल्या आवरणांच्या बाहेरील पोकळीस एपीड्युरल स्पेस असे म्हणतात.मज्जारज्जुपासून निघणारे अनेक मज्जातंतू या स्पेस मध्ये असतात.

एपीड्युरल एनाल्जेसिया देताना भूलतज्ञ ,मणक्यांच्या मधल्या जागेतून एक सुई या स्पेस मध्ये टाकतात.त्या सुईच्या मधून एक बारीक नळी आत सोडतात व या नळीमधून स्थानिक बधीरकं (local anaesthetics) या स्पेस मध्ये सोडतात. या बधीराकांच्यामुळे मज्जातंतू बधीर होतात. म्हणजेच प्रसुतीच्या कळा निर्माण करणारी यंत्रणा बधीर केली जात नसून फक्त संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा बधीर केली जाते.अर्थातच यामुळे कळा चालूच राहतात पण वेदना जाणवत नाहीत.

मणक्याच्या मधल्या जागेतून इंजेक्शन दिल्याने पाठदुखी होते हा एक फार मोठ्ठा गैरसमज आहे. एपीड्युरल अॅनाल्जेसियाचा आणि पाठदुखीचा काहीही संबंध नाही.प्रेग्नन्सी आणि त्यानंतर होणाऱ्या कंबरदुखी/ पाठदुखीचे कारण प्रेग्नासिमध्ये बदलणारा पाठीच्या कण्याचा बाक हे आहे.डिलिवरी नंतर पोटाच्या आणि पाठीच्या (CORE MUSCLES) व्यायामान त्रास कमी/पूर्ण बंद होतो.

pain in curve of spine

काही दुष्परिणाम जसे डोकेदुखी,मळमळ होणे,ब्ल्डप्रेशर कमी होणे असे अनुभवास येते पण या तक्रारीही उपचारांनी कमी होतात आणि त्या तात्पुरत्याच असतात.

खरंतरसध्याची नवीन प्रगत बधीरकं आणि त्यांचा कमी डोसमध्ये केलेला वापर यामुळे पूर्वीपेक्षा आता एकूणच धोके ,गुंतागुंत आणि परिणामी लागणाऱ्या शस्त्रक्रियेच प्रमाण खूपच कमी झालेलं आहे, या सर्व बाबी भूलतज्ञ आणि उपचार करणारे तुमचे डॉक्टर तुम्हाला समजावून सांगतीलच.

सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे वेदना कमी होणं आणि त्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम !

वेदना कमी होताच स्वतः पेशंट अतिशय तणावमुक्त /रिलॅक्स्ड होते आणि तिची आधीची वेदनेला असणारी प्रतिक्रिया थांबते. गर्भाशयाचं तोंड यानंतर लवकर उघडू लागतं आणि बाळंतपणाला लागणारा वेळ कमी लागतो.याखेरीज वेदनेमुळे शरीरात होणारे नको ते रासायनिक बदल गर्भाशयाला होणारा रक्त पुरवठा आणि पर्यायानं बाळाला होणाऱा ऑक्सिजन पुरवठा कमी करतात,एपीड्युरलनंतर वेदना कमी झाल्यावर हा पुरवठा कमी होत नाही.याचा फायदा काही समस्या असलेल्या माता आणि बाळांना नक्कीच होतो.

दुखण्याचा त्रास कमी झाल्यावर ती स्त्री चांगल्या प्रकारे सहकार्य करते ,तिचा एकूण बाळंतपणाच्या प्रक्रियेतला सहभाग वाढतो आणि ती उत्साहानं आपल्या बाळाच्या येण्याची वाट पाहू लागते. ज्या स्त्रियांना गर्भारपणामध्ये उच्च रक्तदाब,मधुमेह ,दमा अश्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी एपीड्युरलचा पर्याय चांगला असतो.

नाही,असं अजिबातच नाही.एपीड्युरल नंतर जरी सीझर करावं लागलं तरी त्याचं कारण एपीड्युरल हे नसून त्यावेळची बाळाची स्थिती,गर्भाशयाचं तोंड हवे त्या प्रमाणात न उघडणं असं काही असू शकतं.

जानकी मॅटर्निटी होममध्ये केलेल्या केसेसच्या आमच्या अनुभवानुसार ९०% ते ९५% स्त्रियांची प्रसूती नॉर्मलच झाली आहे. तेव्हा” कळा सहन केल्या म्हणजेच खरं आईपण!” अश्या गैरसमजुती दूर करूनएपीड्युरल विषयी शास्त्रीय माहिती करून घ्यावी म्हणजे मनातली भीती कमी होईल आणि तसा योग्य निर्णय तुम्हाला घेता येईल.