नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन नंतर

सुरुवातीचे सहा ते आठ दिवस पाळी पेक्षा थोडा जास्त किंवा तेवढाच रक्तस्त्राव होईल व त्यानंतर त्याचे प्रमाण हळूहळू कमी होईल. एखादवेळेस कमी झालेला रक्तस्त्राव परत अचानक वाढला आहे असे होऊ शकते. एक ते सव्वा महिन्यात रक्तस्त्राव पूर्ण बंद होतो.तसे न झाल्यास अथवा जास्त रक्तस्त्राव झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टाके सहसा विरघळून जाणारे असतात. एपिझिऑटॉमीचे टाके आठ ते दहा दिवसात विरघळून जातात. टाके दुखत असल्यास वेदनाशामक औषधे घेऊ शकता किंवा बर्फाच्या पिशवीने शेकू शकता. टाक्यांची जागा स्वच्छ ठेवावी त्यासाठी गरम पाण्याने धुऊ शकता.त्यांवर जास्त ताण येईल अशाप्रकारे मांडी घालून बसू नका.

ड्रेसिंग असले तरी ते ओले होऊ न देता अंघोळ करू शकता. आठव्या दिवशी ड्रेसिंग काढून टाकावे. व दहाव्या दिवशी टाक्यांची नॉट काढण्यासाठी दवाखान्यात यावे.

पोटाचा स्नायू अगदी पहिल्या इतका नीट होत नाही. तरीही त्याची ताकद भरून येण्यास व त्याचा टोन चांगला होण्यासाठी तीन महिने लागतात. तीन महिन्यानंतर पोटाचे पाठीचे व्यायाम करून वजन आटोक्यात ठेवून व आहार व्यवस्थित घेऊन पोट कमी होते. नॉर्मल डिलिव्हरी नंतर दीड महिन्यांनी कोअर एक्सरसाइज सुरू करू शकता. सिझेरियन नंतर तीन महिन्यांनी कोअर एक्ससाइज एस करू शकता. बेल्ट किंवा पोट पट्टा बांधल्याने सैल झालेल्या स्नायूला आधार मिळतो. हालचालीमुळे होणाऱ्या वाय गोळ्याच्या वेदना( पोस्ट डिलिव्हरी कॉन्ट्रक्शन) कमी होऊन त्रास कमी होतो. पण पट्टा बांधून पोट कमी होणार नाही.

दर दोन ते तीन तासांनी थोडे थोडे खात राहा. साधारण तीन ते चार लिटर पाणी प्या. घरातले इतर जण जसे आणि जे जेवण घेत आहेत हे सर्व तुम्ही खाऊ शकता . सर्व फळे पालेभाज्या कडधान्य मांसाहार तुम्ही खाऊ शकता . स्वच्छ ताजे पोषक अन्न खा. साखर तूप आणि तळलेले याचे अतिप्रमाणा टाळा.

  • पाणी घालून केलेल्या पातळ भाज्या व चुरून/ कूचकरूनच खावे :नाही ,असे खाण्याची गरज नाही. असे जेवण बेचव लागते, भूक भागत नाही, पोट साफ होत नाही आणि दुधावर परिणाम होतो.
  • जास्त पाणी प्यायल्याने दूध पातळ होते म्हणून पाणी कमी प्यावे :नाही, तहान भागेल एवढे व शरीरास आवश्यक तेवढे पाणी जरूर प्यावे. हिवाळ्यात आवश्यकता असल्यास गरम पाणी प्यावे अन्यथा उकळून गार केलेले स्वच्छ पाणी प्यावे.
  • सिझर झाल्यामुळे मुळे कंबर दुखी होते: नाही ,वाढलेले वजन,चुकीचे पोस्चर, वाढलेला कण्याचा बाक या मुळे कंबर दुखते. योग्य व्यायाम आणि योग्य पोस्चर याने फायदा होतो.
  • पारंपारिक पदार्थ:हळीव, डिंक ,मेथीदाणा आणि सुकामेवा यातील पोषक घटकांचा फायदा नक्कीच होतो. हे पदार्थ प्रमाणात घ्यावे मात्रं अतिरिक्त तूप आणि साखर गूळ यामुळे वजन वाढते.
  • तेल मालिश: आईला सुखकारक आणि आरामदायक असे मालिश ऋतुमानाप्रमाणे योग्य /अयोग्य माहिती घेऊन करावे. हलक्या हाताने जास्त जोर न लावता मालिश करावे. मालीश नंतर स्वच्छ आंघोळ करावी तेलकट राहू नये. सिझेरियन झाले असल्यास टाक्यांची जागा व पाठीच्या कण्यात दिलेल्या इंजेक्शनची जागा जोराने रगडू नये
  • धूरी: ऍलोपॅथीच्या विचारानुसार याचा काही उपयोग नाही. उलट धुराचा त्रास आणि धोका जास्त आहे.
  • बाळाला आंघोळ मालिश: नवजात बालकाला अंघोळी ची गरज नाही. गरम पाण्याने मऊ कपड्याने पुसून घ्यावे. कानात,नाकात, बेंबीवर, शि-शुच्या जागी तेल टाकू नये टाळू भरायची गरज नाही, ती आपोआप भरते. बेसन हळद रगडून केस/ लव जात नाही उलट रॅश येते. केसांची मुळे त्वचेखाली असतात वरून रगडून ती जात नाहीत
  • बाळंतिणीचे रुमाल बांधून कान झाकणे; याची आवश्यकता नसते कान न झाकल्यास डोके दुखते हा गैरसमज आहे. डोकं दुखत असेल तर ब्लड प्रेशर तपासावे.
  • बाळाच्या डोळ्यात काजळ घालून दृष्टी सुधारत नाही की डोळ्यांचा आकार मोठा होत नाही, उलट इन्फेक्शन चा ऍलर्जीचा धोका वाढतो.
  • बाळाला गुटी: आईच्या दुधात बाळासाठी आवश्यक सर्व घटक असतात. ते बाळाला पचतील, उपयोगी पडतील अशा स्वरूपात असतात. सुरुवातीस येणारा चीक रोगप्रतिबंधक गुण असलेला असतो. आईच्या दुधात पुरेसे पाणीही असते. निसर्गानं आईच्या दुधाची निर्मिती बाळा साठीच केली आहे.

आई बाळाला अंगावर पाजायला असल्यास आणि पाळी आल्यास दिवस राहणार नाही असा सर्वसामान्य गैरसमज आहे तेव्हा सावध राहा गर्भनिरोधक उपाययोजनांची माहिती करून घ्या आणि आपल्याला योग्य वाटेल त्यानुसार निर्णय घ्या खालील तक्त्यात आई बाळाला पाजत असतानाच्या काळात सुरक्षित अशा 

गर्भनिरोधकांची थोडक्यात माहिती दिली आहे

कॉपर-टी

दीड महिन्यानंतर ,पाळी आल्यास पाळीच्या ३ ते ५ दिवसात 

निरोध/कॉंन्डोम

संबंध ठेवण्याआधी पुरुषाने वापरावयाचे 

गर्भनिरोधक प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल्स.

रोज एक गोळी याप्रमाणे 

इन्जेक्शन 

दर तीन महिन्याने एक डोस 

 बाळ अंगावर पीत असताना पाळी, कधी कधी अनिश्चित काळापर्यंत येत नाही किंवा अनियमित येते काही बायकांना मात्र दीड ते दोन महिन्यांनी नियमित पाळी येऊ लागते.

 पाळी सुरू झाल्यास गर्भ राहण्याची शक्यता वाढते तेव्हा पाळी आली नाही अनियमित आली तरीही गर्भनिरोधक काचा विचार नक्की करा.

 

सुरुवातीचे काही दिवस आई आणि बाळ यांचा भावबंध जूळण्यास, त्यांचा ताळमेळ जमण्यास वेळ लागतो. बाळाला पाजणं नीट जमत नाही  किंवा कधीकधी बाळ जास्ती रडतं,याचा आईच्या मनावरती ताण येतो.

 कधीकधी झोप नीट होत नाही , नीट भूक  भागत नाही,कुठेकुठे दुखत असतं याचाही मानसिक ताण येतो. 

याखेरीज शरीर पूर्वीसारखे सशक्त नाही, सैल पडले आहे अशीही भावना येऊन निराश वाटू शकते.

 वेगवेगळ्या कारणांनी या काळात स्त्रीला मानसिक ताण येतात आणि निराश वाटू शकते.

असे वाटल्यास जवळच्या व्यक्तीशी विनासंकोच संवाद साधावा, डॉक्टरांशी जरूर संपर्क साधावा आणि गरज भासल्यास  उपचार करून घ्यावा.