Covid-19 FAQ's

गेल्या काही महिन्यांपासून लहान मोठ्या सर्वांच्याच चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे तो म्हणजे आत्ताची करोना व्हायरसची  साथ, या इन्फेक्शनचा प्रसार रोखण्यासाठी राबवलेले लॉकडाउनचे तंत्र आणि प्रसारमाध्यामांनी पोहोचवलेली खरी/खोटी माहिती.

या बदलत्या परिस्थितीनुरूप थोडेफार बदल सगळ्यांनाच करावे लागले,तसे आम्हीही आमच्या बाह्यरुग्ण तपासणीच्या पद्धतीत आणि वेळेत बदल केले आहेत.गरोदर स्त्रियांच्या तपासणीचे वेळापत्रक बदलून सध्या संपूर्ण नऊ महिन्याच्या काळात आवश्यक अशा चार ते पाच वेळाच स्त्रीला तपासणीसाठी क्लिनिक मध्ये बोलावले जाते आणि रिपोर्ट बघणे,त्यावरून सल्ला देणे हे मोबाईल, फोन, व्हॉटस्अप या माध्यमातून केले जाते.

तसेच डिलीव्हरीसाठी भरती केल्यानंतरही केवळ एकाच नातेवाईकांना पेशंट सोबत थाबंयाची परवानगी दिली जाते.तुमच्या या आनंदाच्या प्रसंगी तुमचे आप्त स्वकीय सोबत असावेत भेटायला यावेत ही इच्छा आम्ही नक्कीच समजतो पण तुमच्या आणि होणाऱ्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी हे बदल गरजेचेच आहेत.

प्रेगनंसी मध्ये काही  स्त्रियांच्या बाबतीत रोगप्रतिकारक शक्ती संसर्गजन्य रोगांना प्रतिकार देण्यास कमकुवत/ बदलेली असू शकते त्यामुळे गरोदरपण ही सहज परिणाम होईल अशी (vulnerable) स्थिती समजली जाते.तेव्हा गरोदरपणात आणि  प्रसूतीनंतरही स्त्रियांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

या काळात  गर्भवती स्त्रियांच्या मनात या आजाराबाबत  अनेक प्रश्न, शंका आणि थोडीशी भीतीही आहे असं लक्षात आलं.

अशा काही विचारलेल्या प्रश्नांना दिलेला  हा प्रतिसाद :

नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली असेल तर राहू देण्यास काही हरकत नाही परंतु गर्भधारणेसाठी उपचार करावे लागणार असतील (इन्फरटीलीटी साठी उपचार) करावे लागणार असतील तर ते काही काळासाठी लांबणीवर टाकलेले चांगले.आत्तातरी किती काळासाठी ?, हे निश्चीत सांगणे शक्य नाही. तरीही या आजाराच्या नवीन रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला म्हणजे ठरवता येईल.

सद्य परिस्थिती अशी आहे की हा विषाणू आणि त्यामुळे उद्भवणारा आजार दोन्हीही साऱ्या जगालाच नवीन आहेत. त्यामुळे असे काही खात्रीने घडेल किंवा घडणारच नाही असे सिद्ध करणारे ठोस पुरावे,शास्त्रीय परीक्षणे उपलब्ध नाहीत. आईकडून बाळाकडे वारेमार्फत आजार काही प्रमाणात संक्रमित होण्याची शक्यता वर्तवली असली तरी गर्भपात झाल्याची अथवा प्रिमॅच्युअर डिलिव्हरीची उदाहरणे नाहीत.  

तरीही गरोदर मातेस हा संसर्ग झाला  व अति तीव्र स्वरूपाचा आजार झाला तर त्यामुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.

कोव्हिड पॉझिटिव्ह मातेच्या नवजात बालकालाही संसर्ग झाल्याचे जेव्हा आढळले तेव्हाही त्याचे कारण प्रसूती नंतर नवजात बाळाची देखभाल करणारे नातेवाईक,कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न  करण्यामध्ये होते.

सध्या वापरात असलेल्या औषधांपैकी HCQ, Azithromycin, ARV group ही औषधे सुरक्षित आहेत. तरीही या आजाराच्या औषधोपचार आणि त्याचे गर्भावरील परिणाम याबाबत अजून आभ्यास,निरीक्षणे आणि प्रयोग होण्याची गरज आहे.

हो,अशी आई ,सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून बाळाला, स्तनपान करू शकते.हा विषाणू आईच्या दुधातून बाळाकडे संक्रमित होत नाही असे सध्याचे निरीक्षण आहे.

बाळाला घेण्यापूर्वी हात स्वच्छ ( साबण आणि पाण्याने) धुवणे,तोंडावर मास्क बांधणे आणि आजाराच्या तीव्रतेनुसार वेगळ्या खोलीत राहणे आवश्यक असेल तर बाळाला पाजून झाल्यावर तसे करणे, अशी काळजी घ्यावी.

सद्य परिस्थितील वाढती रुग्णसंख्या पाहता गर्भवतीने प्रवास न केलेलाच चांगला .शिवाय काही जिल्हे,गावे जी हॉटस्पॉट म्हणून घोषित केली आहेत अशा ठिकाणी आपण जाणे व त्या ठिकाणाहून कोणाला बोलावणे दोन्हीही टाळावे.

अत्यावश्यकच असेल तर तेवढा धोका पत्करावा लागेल आणि सरकारी आदेशांनुसार इतर नियमांची अंमलबजावणीही करावी लागेल.

  • बाहेर/गर्दीच्या, समारंभाच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • सर्दी,ताप,खोकला अशी लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या  संपर्कात येणे टाळा.
  • नियमितपणे हात धुवा.
  • शिंकताना ,खोकताना नाकातोंडावर रुमाल धरा.
  • नाकाला,डोळ्यांना आणि तोंडाला हात लावू नका.
  • कोणाशीही संभाषण करताना एक मीटर /दोन हातांचे अंतर राखून बोला. 
  • फोनवर बोलून चौकशी करून मगच दवाखान्यात जा.सोबत केवळ एकाच जबाबदार व्यक्तीस घेवून जा आणि फीसाठी ,औषधासाठी लागणारे नेमके आणि सुट्टे पैसे घेवून जा.डिजिटल पेमेंट करता आले तर बरेच.
  • आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित संपर्क करा.

हा विषाणू ,त्याने होणारा आजार ,त्याची लक्षणे याविषयी शास्त्रीय माहिती करून घ्या.ज्या माहितीची आपल्याला गरज नाही आणि उपयोगही नाही अशा त्रासदायक माहितीचा विचारही करू नका आणि कोणाशी त्याबद्दल विनाकारण बोलताही बसू नका.ताजा,पोषक आहार,घरी करता येईल असा व्यायाम आणि सकारात्मक विचारांची जोड ठेवली तर हा अवघड काळही निघून जाईल अशी आशा बाळगा.

         काही त्रासदायक घडामोडी,बंधने,जवळच्या लोकाच्या गाठीभेटी न होणे,आर्थिक ताणतणाव आणि भविष्याची अनिश्चितता अशा गोष्टी सचिंत करणार हे स्वाभाविक आहे पण यामध्ये तुम्ही एकट्या नाही आहात ,सगळ्यांनाच कमीजास्त प्रमाणात हे सोसावे लागणार आहे.तेव्हा धीर राखून मनाला बळकट करा.

चांगली पुस्तकं वाचणं,संगीत/गाणी ऐकणं,स्नेहीजनांशी फोनवर गप्पा करणं,आपले छंद जोपासणं असे वेगवेगळे प्रयत्न करून आनंदी रहा.